नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. शिवाजी बनसोडे व सोलापुर येथील आदर्श हायस्कुलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. निनु बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिवाजी बनसोडे हा नुकत्याच झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून देशात 96 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सिद्धार्थ बनसोडे यांनी मिळविलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.
सिद्धार्थ बनसोडे यांने “भारतीय अभियांत्रिकी सेवा (इंजिनिअरींग सेवा)“ ची परीक्षा दिली होती. सध्या तो स्पर्धा परीक्षा पास होऊन चेन्नई येथे डी. आर. डी. ओ.(संरक्षण संशोधन व विकास संस्था) येथे शास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत आहे. हे करीत असतानाच त्यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. सिद्धार्थ बनसोडे यांनी मिळविलेल्या या यशाने ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे नावलौकिक देशात झाले आहे.