धाराशिव (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशसह देशातील इतर राज्यातही समाजवादी पक्षाची पाळीमुळे घट्ट करून भरारी घेण्याचा चंगच समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बांधला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातही विविध सामाजिक विषयावर काम करणाऱ्या आंदोलन, चळवळीतील समाजवाद्यांना आता फक्त समाजवादी पक्षच  आशेचा किरण व आधार वाटत  असल्याचे स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

  आणीबाणी विरोधात रान पेटवणाऱ्या जयप्रकाश नारायण यांचा वारसा सांगत महाराष्ट्रात अनेक युवकांनी सत्तरीच्या दशकात स्वतःला विविध आंदोलनात व चळवळीत झोकुन दिले .केंद्रात जनता पार्टी व राज्यात पुलोद सरकार आल्यानंतर समाजवादी चळवळ आणखी वेगाने  पुढे जाईल असे वाटत होते, मात्र जनता पार्टीची अनेक शकले झाल्यानंतर बहुतांश नेते अनेक संघटनांमध्ये विखुरले गेले. त्यातच आता धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान एच .डी. देवेगौडा यांनी भाजपबरोबर घरोबा केला तर जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार कधी भाजप बरोबर संगणमत करतील याचा भरोसा ना जनतेला ,ना समाजवाद्यांना .त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष जनता दलातील 80% कार्यकर्ते समाजवादी पक्षात प्रवेश करते झाले तर आता समाजवादी परिवारातील सर्वांचा ओढा समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव व प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार झाला आहे. समाजवादी विचारांच्या सर्व पक्षांना आता समाजवादी पक्षात विलीन होणे ही काळाची गरज झाली आहे .देश व महाराष्ट्र संकटात आल्यानंतर सर्वांना दिशा देण्याचे काम समाजवादी चळवळीने केले आहे. स्वातंत्र्यलढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र व मुंबईच्या लढ्यातही देश व संविधान वाचविण्यासाठीही समाजवादीच अग्रेसर होते .संघ भाजप विरोधातील लढाईमध्ये नितीश कुमार हे आयत्यावेळी दगा देणारे बेभरवशाचे साथी आहेत आणि ते कुठच्याही क्षणी संघाच्या मांडीवर बसायला तयार असतात. कारण जवळजवळ वीस वर्षांनी नितीश कुमार आधी समता पक्ष व जनता दल युनायटेड हे भाजपबरोबर होते .भारतावर इंदिरा गांधी  यांनी लादलेल्या आणीबाणी नंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. याही राजकीय पक्षाचे अनेक तुकडे होऊन अनेक पक्ष निर्माण झाले परंतु आता देशाची घटना वाचविणे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा एकमेव समाजवादी  पक्षच  असल्याचा भरोसा महाराष्ट्रातील सर्व समाजवादी परिवाराचा बसला आहे .त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात  समाजवादी पार्टी प्रचंड भरारी घेईल असेही ॲड. भोसले यांनी म्हटले आहे.


 
Top