धाराशिव (प्रतिनिधी) - कलाविष्कार अकादमी व मराठवाडा साहित्य परिषद आयोजित कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी प्रख्यात कवी हणमंत पडवळ होते. तर व्यासपीठावर कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष तथा संयोजक युवराज नळे, बुबासाहेब जाधव, राजेंद्र अत्रे, पं. दीपक लिंगे, दास पाटील, शेषनाथ वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कविसंमेलनामध्ये जिल्हाभरातून कवींनी सहभाग नोंदवला होता. कवी कृष्णा साळुंके यांच्या, “एक खत लिखा था मैने और कुछ यूं लिखा था, मानो एक फकीर ने जैसे खुद का नसीब लिखा था “ या गझलेने रसीकांची मने जिंकली. कवी युसूफ सय्यद यांनी “पोरकं होतं म्हणे पोर त्यो रस्त्यावर्ती बसलेलं, येणार जाणार पाहत होते अंग त्याच मळलेल“ ही वास्तववादी कविता सादर केली. कवयित्री सुनिता गुंजाळ यांनी
“स्वप्नसुंदरी समोर त्याच्या तरी पापणी उचलत नाही, इतका सज्जन भोळा नवरा, कधी कोणाला भेटत नाही“ ही गझल सादर करून रसिकांची मने जिंकली. “सांभाळून रहावे तोल..“ ही पंडीत कांबळे यांची कविता माणसाच्या जगण्यातील माणुसपण हरवल्याची जाणीव करून देते आणि वेळेचे भान ठेवून सत्यनिष्ठेने आपले काम करीत रहावे हा आशय मांडते. स्नेहलता झरकर यांनी,
“देऊन चूक केली दुःखास मी निवारा, लावून कूळ बसले मांडून ते पसारा“ 'या गझलेतून दुःखावर मात करण्याचा संदेश दिला. तर ग्रामीण भागातील उदयोन्मुख युवा कवी गणेश मगर याने “आसवांत मरतो शेतकरी, निलाम घरबार होताना,
विकल्या जातात जमिनी, मग खुप लाचार होताना..“ ही शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता सादर केली. तर गझलकार बाळ पाटील यांची “जेवढा गजबजाट असतो बघ,
तेवढा शुकशुकाट असतो बघ..“ ही गझल अंतर्मुख करून गेली. कवी डॉ रुपेशकुमार जावळे, शेखर गिरी, सुभाष चव्हाण, शाम नवले, विजय देशमुख, डॉ अस्मिता बुरगुटे, मनिषा खडके, अश्विनी धाट, ज्योती मगर, स़ंजय धोंगडे, प्रा. जयराम मुसळे, शंकर खामकर, संध्याराणी कोल्हे यांच्याही रचना रसिकांना अंतर्मुख करून गेल्या.
शेवटी कवीसंमेलन अध्यक्ष हणमंत पडवळ यांनी, “मुळ्याच आधार सोडू लागल्यात तर झाडानं कसं उभं रहावं,
हात जोडतोय देवाला दोघांनाही एकदाच न्यावं“ जखमा आणि वेदना' या कवितेतून घराघरात मुलांकडून आईवडीलांची होणारी आबाळ मांडताना दमछाक झालेल्या बापाच्या कवितेने कवीसंमेलनाची सांगता झाली.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले, तर आभार जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांनी मानले. यावेळी सिनेट सदस्य देविदास पाठक, प्रा. अभिमान हंगरगेकर, ॲड लोमटे महाराज, प्रशांत पाटील, भा.न. शेळके, रविंद्र शिंदे, अस्मिता शिंदे, बाबा गुळीग, तौफिक शेख, महेश मोटे, मुकुंद पाटील, धनंजय कुलकर्णी , नेताजी मुळे यांच्यासह अनेक मान्यवर रसीक, श्रोते हजर होते.