धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. आजही काही लाभार्थी केंद्राच्या विविध योजनांपासून वंचित आहे.या लाभार्थ्यांना व नागरिकांना योजनांची माहिती व्हावी आणि त्यामाध्यमातून त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभार्थी व नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यात यावी.असे निर्देश केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी दिले.

17 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात “ विकसित भारत संकल्प यात्रा “ मोहिमेच्या तयारीचा आढावा आयोजित सभेत घेतांना श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरदास,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोडभरले,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय रंजनदास यांनी प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती लवंगारे वर्मा पुढे म्हणाल्या,योग्य माहिती योग्य वेळी मिळाल्याने योग्य निर्णय घेणे अतिशय सुलभ होतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला सर्व योजनांची माहिती मिळेल हे सुनिश्चित करण्यात यावे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे.ज्या लोकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजना पोहोचल्या नाही तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या गरजू  लाभार्थ्याचा शोध घेवून त्या लाभार्थ्याना योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.त्यामुळे आपली यंत्रणा सज्ज असावी,अशा सूचनाही श्रीमती वर्मा यांनी यावेळी केल्या.

श्रीमती वर्मा पुढे म्हणाल्या की,या मोहिमेचा मुख्य उद्दिष्ट भारत सरकारच्या 20 योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच गेल्या 9 वर्षातील उपलब्धी आणि ऑन स्पॉट सेवांवर लक्ष केंद्रित करणे हा आहे.त्यामुळे जनसामान्यांचे भागीदारीच्या माध्यमातून वैयक्तिक अनुभवाच्या देवाणघेवाणीद्वारे केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधावा.वेगवेगळ्या योजनांबद्दल माहितीचा प्रसार आणि नवीन योजनांबद्दल जागरुकता निर्माण करावी. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सर्व योजनासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंद करावी तसेच प्रत्येक कार्यक्रमात “मेरी कहानी मेरी जुबानी“ अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची मुलाखत घ्यावी.अशा सूचनाही श्रीमती वर्मा यांनी यावेळी दिल्या.

या मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत.यातूनच शासन आणि लाभार्थींमधील सुसंवाद आणखी दृढ होईल.या मोहिमेला सण आणि उत्सवाचे स्वरूप देऊन प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम करणे अपेक्षित आहे.बऱ्याच नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती नसल्याने ते अनेक लाभांपासून वंचित राहतात.अशा वंचित लाभार्थ्यांना ओळखून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा या हेतूने शासकीय यंत्रणेने काम करणे आवश्यक आहे.

भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने “ विकसित भारत संकल्प यात्रा ” नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे.ही यात्रा  15 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी, 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या सभेला जिल्ह्यातील तहसीलदार,गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार,ग्रामविकास अधिकारी ,कृषी सहाय्यक,मंडळ अधिकारी, तलाठी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.


 
Top