धाराशिव (प्रतिनिधी)-राज्यात सर्वप्रथम अग्रिम विमा वितरणास धाराशिव जिल्ह्यातील 40 महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून नळदुर्ग सह वगळलेल्या इतर 17 महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान भरपाईचे जवळपास रु. 70 कोटी मिळणार आहेत व ही रक्कम दिवाळी पूर्वी मिळावी यासाठी ताकतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 40 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात रु 161 कोटी 80 लाख कालपासून जमा होत आहेत. दिवाळीपूर्वी सणासाठी कधी नव्हे ती भरपाईची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील सर्वच मंडळामध्ये नुकसान होते. जिल्ह्यातील 40 महसूल मंडळामध्ये पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिकच खंड पडल्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांनी अग्रिम बाबत अधिसूचना काढली होती, व इतर मंडळातील पीक परिस्थिती विचारात घेवून उर्वरित 17 महसूल मंडळाची दुसऱ्या टप्प्यात अधिसूचना काढली होती. पहिल्या टप्प्यात जाहीर मंडळांतील अग्रिम रकमेचे वितरण सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील 17 महसूल मंडळांना देखील दिवाळी पूर्वीच अग्रिम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सदरील रक्कम जवळपास रु 70 कोटी पर्यंत आहे.
या मध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम,वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या मंडळांचा समावेश आहे.
महायुती सरकार शेतकाऱ्यांप्रती अतिशय संवेदनशील असून विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत.