धाराशिव (प्रतिनिधी) -राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गुरुवारी (दि.12) राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, महाराष्टातील सामान्य जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी मागील 70 वर्षात सरकारने अनेक प्रकारे प्रयत्न करुन रुग्ण सेवा सामान्य मानसाच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम केले. व त्याद्वारे आरोग्याची सेवा केली. विद्यमान सरकारने 4 ऑक्टोबर रोजी महाराष्टातील काही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर पाच वर्षाच्या कालावधीसाठी चालविण्यास देण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. याच धरतीवर राज्य सरकार इतर जिल्ह्यातही लागू करु इच्छीत आहे ते खाजगीकरण थांबवावे व विना मोबदला आरोग्य सेवा सामान्य माणसाला उपलब्ध करुन द्यावी.
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, युनानी व आयुर्वेदीक रुग्णालय या सर्व ठिकाणी डॉक्टर आरोग्य कर्मचारी कमतरता व औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोग्य विभागातील रुग्णसेवा विनाविलंब सुधारणा करुन कंत्राटी पदावर डॉक्टर व इतर कर्मचारी भरण्याचा शासन आदेश रद्द करावा अन्यथा या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.