तेर (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यांतील जागृत देवस्थान म्हणून प्रचलित असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविक भक्तांसह नागरीकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री हिंगळजाई देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त दिनांक 15 ते 29 आक्टोबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
15 रोजी हिंगळजाई देवीची पहाटेच्या सुमारास महापुजा व किशनगिरी गुरुराजगीरीजी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्र उत्सव काळात दररोज सकाळ सायंकाळ देवीची महापूजा व आरती तसेच आराध्याच्या गाण्यांचे कार्यक्रम होणार आहे. तसेच दिनांक 23 रोजी हिंगळजाई देवीचा उठता उपवास असणार आहे. श्री दत्त मंदिर व हिंगळजाई देवी मंदिरातील होम हवन नंतर हिंगळजाई देवीच्या पालखीची छबीना मिरवणूक निघणार आहे. तर दिनांक 24 रोजी विजया दशमी सीमोल्लंघना दिवशी सायंकाळी श्री दत्तात्रेयांची पालखी हिंगळजाई देवीच्या मंदिरात सीमोल्लंघनासाठी दाखल होईल. दिनांक 29 रोजी देवीची महापूजा व आरती व रात्री हिंगळजाई देवीच्या पालखीची छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह नागरिकांनी हिंगळजाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तात्रय व हिंगळजदेवी मठ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.