भूम (प्रतिनिधी)-आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही . सरकारला वठणीवर आणण्याची ताकद तरुणाईत आहे. येणारा विजय हा आपलाच असेल असे प्रतिपादन मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते भूम येथे  सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शुक्रवार दि. 6 रोजी  आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

 पुढे जरांगे पाटील म्हणाले कि , मराठा समाज बांधवांचे जालना जिल्ह्यातील सराटी आंतरवली येथे आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते. या शासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी मराठा समाजातील माता -भगिनी, लहान बालक, जेष्ठ व युवकांवर अमानुष लाठी हल्ला केला. या लाठी हल्ल्यानेच मराठा समाजाला आंदोलनासाठी एकीचे बळ दिले. मराठा समाजातील एकाही तरुणाने आरक्षणासाठी आपला जीव द्यायचा नाही. जर मराठा समाजातील तरुण आरक्षणासाठी आत्महत्या करत गेले तर मिळणाऱ्या आरक्षणाचा उपयोग काय असेही ते म्हणाले. कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाला आणखी किती पुरावे द्यायचे ते शासनानेच सांगावे.  पुढे बोलताना ते म्हणाले कि , आरक्षण आपल्याला शासनाच्या छाताडावर बसून घ्यायचे आहे. मी कोणालाही भीत नाही. शनिवार दि. 14 रोजी अंतरवली सराटी गावात 150 एकर जागेत सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून घरा घरातील मराठा समाज बांधव येणार आहेत. या सभेसाठी शालेय विद्यार्थी व महिला भगिनींची उपस्थिती मोठया प्रमाणात असणार आहे . त्यामुळे भूम परंडा वाशी तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठया संख्येने हजर राहावे. या दिवशी कोणीही घरी थांबू नका . या सभेला येताना व जाताना सर्वानी शांतता बाळगायची आहे. या दिवशी येणाऱ्या महिला भगिनींचे रक्षणाची जबाबदारी आपली सर्वांची आहे. या सभेस कोठेही गालबोट लागणार नाही  याची सर्व मराठा बांधवांनी खबरदारी घ्यायची आहे.


 
Top