धाराशिव (प्रतिनिधी)-ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर ब्राह्मण बांधव उपोषणाला बसले आहेत. यांच्या उपोषणाला पाठिंबा देत तात्काळ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी धाराशिव येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.20) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ब्राह्मण समाजातील विद्यार्थी, तरुणांनी चांगले शिक्षण घेऊनही त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे. म्हणून ब्राह्मण समाजाच्या वतीने श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याच मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर ब्राह्मण समाजातील रामराम दिनकर जोशी व अनंत देविदास जोशी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीची दखल घेऊन तात्काळ श्री भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ब्राह्मण बांधवानी सुरू केलेले उपोषण सोडवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी गजानन घुगीकर, माधव रामदासी, धनंजय जेवळीकर, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. अभय पाथरूडकर, पदाधिकारी संतोष बडवे, डॉ. गजानन कुलकर्णी, विपीन गंधोरकर, महेश पाठक, मुकुंद भातंब्रेकर, अजय नाईक, राकेश कुलकर्णी, ॲड.लक्ष्मीकांत कुलकर्णी, भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण पाठक, सतीश देशमुख, गिरीष पानसरे यांच्यासह ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.


 
Top