धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शक्तीपीठ एक वैष्विक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने विकास आराखडा तयार करण्यात येत असून पुजारी, स्थानिक नागरिक, व्यापारी  व भाविक भक्तांसह सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मागील सूचनांचा अंतर्भाव करून आई तुळजाभवानी मंदिर विकासाचा 'सुधारित प्रारूप आराखडा' प्रकाशित करण्यात आला आहे, व यामध्ये सर्वांना आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक ,पुजारी,व्यापारी व भाविक भक्तांच्या सोयी-सुविधा व हित विचारात घेवूनच विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. मात्र काही अप प्रवृत्ती जाणीवपूर्वक गैरसमज पसरवीत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी व क्लेशदायी आहे. मोठ्या परिश्रमाने व सर्वांच्या सहकार्याने आपण निधी उपलब्ध करून घेत आहोत. आपल्या शहराच्या, परिसराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांची साथ व सकारात्मकता अभिप्रेत आहे.

या आराखड्याबाबत सर्वांना माहिती देण्याकरिता दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारती समोर प्रारूप आरखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावर प्राप्त सूचनांवरील तांत्रिक व प्रशासकीय विभागाचे अभिप्राय विचारात घेऊन जिल्हाधिकारी धाराशिव तथा मंदिर संस्थान अध्यक्ष यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.

दर्शनास सुलभता निर्माण होणे आणि सर्वांसाठी पुढील अनेक दशके टिकेल असे व्यवस्थापन निर्माण करण्याचा आपला मानस असून आलेल्या सर्व योग्य सूचनांचा विचार करूनच आराखडा अंतिम तयार करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.


 
Top