धाराशिव (प्रतिनिधी) -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शहरातील आदित्य शाम जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते रोख 21 हजार रूपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र  देऊन आदित्य जाधव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आयोजिका ॲड.संध्या सोनवणे उपस्थित होते.

आदित्य जाधव हा अभ्यासू व मेहनती विद्यार्थी आहे. तो सध्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याने यापूर्वीही अनेक निबंध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे विभागीय युवती अध्यक्षा ॲड.संध्या सोनवणे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात आदित्य जाधव याने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि करिअरच्या वाटा या विषयावर निबंध अभ्यासपूर्ण लेखन केले होते. त्यामुळे त्यास प्रथम क्रमांक मिळाला आहे.दरम्यान, आदित्य जाधव यांच्या यशाबद्दल बालाजी झोंबाडे, कलीम शेख, तुकाराम चांदणे, रोहित आडसुळ, नानासाहेब झोंबाडे, आकाश रसाळ, रोहन शेंडगे, रोहन आडसुळ, सचिन रसाळ, सुयश झोंबाडे, दादा रसाळ, प्रा.शिवाजी गायकवाड, कृष्णा जाधव, प्रा.सुवर्णा आंबेकर, सिध्देश्वर वाघमोडे, प्रविण मंजुळे, समर्थ राजगुरू, ओमकार झाल्टे यांनी पेढे भरवून अभिनंदन केले आहे.

माझ्या कष्टाचं लेकरानं सोनं केलं, आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

घरचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी मी दिवसभर राबते. एकवेळ पोटाला चिमटा घेते. पण, जमेल तसे पोरांना शिकवते. त्यालाही गरीबीची जाण आहे. म्हणून तो हाती पडेल ते काम करतो. चांगला अभ्यास करतो. रात्री उशिरापर्यंत लिहितो आणि वाचतो. आज माझ्या लेकराला कसला तरी पुरस्कार मिळालाय, हे ऐकून लय आनंद झाला. माझ्या कष्टाचं लेकरानं सोनं केलं, असे सांगताना आदित्य जाधव याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.


 
Top