धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील तावरजखेडा येथील जवान सुभेदार मेजर सुर्यकांत फेरे हे 10 ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे अपघाती मृत्यू होऊन कर्तव्यावर असताना शहिद झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दि. 11 ऑक्टोबर रोजी तावरजखेडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी भारतीय सैन्य दलातील चार सुभेदार व जवळपास 25 जवान सैनिक, ढोकी पोलीस ठाण्यातील व पोलीस अधीक्षक कार्यालयातील राखीव पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देऊन शहिद जवान सुर्यकांत फेरे यांना मानवंदना दिली. धाराशिव तालुक्यातील तावरजखेडा येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सुर्यकांत श्रीमंत फेरे हे कर्तव्य बजावत असताना बेंगलोर येथे शहिद झाले. ते मंगळवारी दि. 9 ऑक्टोबर रोजी तीन मजली इमारतीवरून पडल्याने व गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  शहिद जवान सुर्यकांत फेरे हे भारतीय सैन्य दलात सुभेदार मेजर म्हणून कार्यरत होते.

अंत्यसंस्कारावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, धाराशिव तहसील कार्यालयातील तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, अपर तहसीलदार काकडे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील राखीव पोलीस अधिकारी, ढोकी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक सुहास गवळी, पोलीस कर्मचारी, तावरजखेडा व परिसरातील कोंड, गुंफावाडी, मुरूड, जागजी, सुंभा, आरणी, जायफळ (ता. औसा) येथील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहिद सुर्यकांत फेरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान मुलगा व मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.


 
Top