वाशी (प्रतिनिधी)-तालुक्यातील सारोळा लींक लाईनच्या कामाचे काय झाले असा जाब विचारत वाशी उपविभागाचे प्रभारी उप कार्यकारी अभियंता जोतिर्लिंग हिंगमिरे यांना ॲड सूर्यकांत सांडसे, विनोद माने व भागवत कवडे यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात केली असून, त्यांच्या डोक्यात खुर्ची मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी एक वाजेच्या सुमारास महावितरणच्या वाशी उपविभागीय कार्यालयात घडली.
महावितरणच्या वाशी उपविभागीय येंथे वीज ग्राहकांच्या तक्रारी जागेवरच सोडविण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लिंकलाईनच्या कामाबद्दल सारोळा येथील ॲड. सुर्यकांत सांडसे यांनी फोनवरून विचारले होते. त्यानंतर प्रत्यक्ष ॲड. सांडसे, भागवत कवडे व विनोद माने महावितरण कार्यालयात गेले. त्यानंतर अभियंता व त्यांच्यात वादविवाद होवून वरील प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
अभियंता हिंगमिरे यांच्या फिर्यादीवरून सूर्यकांत सांडसे, विनोद माने यांच्यासह भागवत कवडे यांच्या विरुद्ध वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल वाशी पोलीस ठाण्यात ॲड. सुर्यकांत सांडसे, भागवत कवडे व विनोद माने यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 323, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महावितरण कर्मचारी आणि अधिकारी वर्गातून संताप व्यक्त केला जात असून, मारहाण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत अटक न झाल्यास कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.