कळंब (प्रतिनिधी)-कळंब शहरात सोमवारी (दि.11) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ढोकी रोडवरील साई मंगल कार्यालयात हा नोकरी महोत्सव होणार असल्याची माहिती विश्वजित नरसिंग जाधव यांनी दिली. या सुवर्णसंधीचा बेरोजगार युवक, युवतींनी लाभ घ्याव असे आवाहनही त्यांनी केले.
कळंब शहर व तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख नरसिंग जाधव यांनी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले होते. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवत कळंब शहरामध्ये धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील 35 कंपन्यांमार्फत बेरोजगार युवक, युवतींची पात्रतेनुसार निवड करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना नोकरी मिळणार नाही अशा युवक, युवतींना जॉब कार्डचे वितरण करण्यात येणार असल्याचे विश्वजित जाधव यांनी सांगितले. या महोत्सवात कळंब शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी सहभागी होऊन नोकरीचा लाभ घ्यावा असे आवाहनही विश्वजित जाधव यांनी केले आहे.