नळदुर्ग (प्रतिनिधी)- जोश, उत्साह आणि प्रचंड जल्लोषात ऐतिहासिक नळदुर्ग शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी एक महिन्यापासुन आयोजित केलेल्या हुतात्मा स्तंभ पुजनाच्या कार्यक्रमाचा दि.16 सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला. यावेळी शहरांतुन भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपुर्ण एक महिना हुतात्मा स्तंभाचे पुजन करून हुतात्म्यांना अभिवादन करणारे नळदुर्ग शहर हे मराठवाड्यातील एकमेव शहर ठरले आहे. याचे सर्व श्रेय माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनाच द्यावे लागेल. त्यांच्या सांकल्पनेतुन आयोजित केलेल्या हुतात्मा स्तंभ पुजनाच्या कार्यक्रमामुळे शहरांतील जवळपास 2 हजार 500 पेक्षा जास्त नागरीकांना मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाचा इतिहास माहीत झाला हे या कार्यक्रमाचे फलित आहे. दि.17 ऑगस्ट रोजी या हुतात्मा स्तंभ पुजनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याचा समारोप दि.16 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या उत्साहात व शेकडो नागरीक व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी सकाळी 9.30 वा. लोकमान्य वाचनालयापासुन शालेय विद्यार्थी व नागरीकांनी भव्य शोभा यात्रा काढली. शोभायात्रा चावडी चौकात आल्यानंतर चावडीमध्ये हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या प्रतिमेचे शहर व्यापारी मंडळाच्या वतीने पुजन करण्यात आले.

यानंतर हुतात्मा स्मारकात झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाचे पुजन करण्यात आले. यानंतर सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विनायक अहंकारी यांनी गेल्या महिनाभर झालेल्या कार्यक्रमाची माहिती दिली व शहरांतील सर्व नागरीकांचे त्यांनी आभार मानले. तसेच माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,संजय बताले, शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,सुभद्राताई मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाचा इतिहास सांगण्याबरोबरच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विनायक अहंकारी यांचे कौतुक केले.

शहरांतील ठाकुर परीवार,ब्राम्हण समाज व पेशवा युवा मंचच्या वतीने शोभयात्रेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना केळी, बिस्कीट व पाण्याचे वाटप केले तर हुतात्मा स्मारकात नगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना तसेच नागरीकांना केळी, बिस्कीट व पाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे,नितीन कासार, माजी नगरसेवक बसवराज धरणे, संजय बताले, किशोर नळदुर्गकर, भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुशांत भुमकर,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी,बलभीमराव मुळे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनजगोळे,अमर भाळे भोई समाजाचे शहर अध्यक्ष सुनिल उकंडे, उमेश नाईक, मुकुंद नाईक,दत्तात्रय कोरे, खंडेशा कोरे, भिमाशंकर बताले, शाम कनकधर,दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे, महिला शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका उमाताई जाधव, सौ. परळकर , मिलनताई कासार यांच्यासह शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, माजी शिक्षक,व्यापारी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

–—

हुतात्मा स्तंभ पुजनाच्या कार्यक्रमास युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे विशेष सहकार्य मिळाले आहे. याबद्दल युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांचे विनायक अहंकारी यांनी आभार मानले आहे.


 
Top