धाराशिव (प्रतिनिधी)-श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे धाराशिव जिल्ह्यात व शहरात सर्वत्र उत्साहात आगमन झाले आहे. श्री गणेश चतुर्थीच्या सणामुळे बाजार पेठेत सर्वत्र उत्साह दिसून आला.
अपुरा पाऊस यामुळे जिल्ह्यासह शहरास सर्वत्र दुष्काळाचे सावट असले तरी श्री गणेशाच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. यावर्षी गणेश मुर्तीच्या भावात 10 ते 15 टक्के भाववाढ झाल्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे फुले, हार यामध्येही नेहमीप्रमाणे दुप्पट भाववाढ पहायला मिळाली. हार विक्रेत्यांना अपुरा पाऊस यामुळे फुले बाजारात येत नाहीत. फुलांचे उत्पादन कमी होत आहे त्यामुळे भाववाढ झाल्याचे सांगितले. तर मुर्तीकार बालाजी डोंगे यांनी कलर वर 11 टक्के जीएसटी, प्लॉस्टर ऑफ पॅरेसचे भाव पण वाढले. त्याचप्रमाणे लेबर चार्ज वाढल्याने गणेशमुर्तीचे भाववाढ झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी परिवारासह बाजारपेठेत येवून गणेशमुर्ती घेतली.
पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सुचनेनुसार एक पोलिस एक गणेश मंडळ यासह सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात 1 हजार 500 गणेश मंडळ
धाराशिव जिल्ह्यात पोलिस सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण 1 हजार 437 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात काही गावात एक गाव एक गणपती याप्रमाणेही श्रीगणेशाची स्थापना काही गावात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यासह लेझीम, झांज पथक आदींने वाजत-गाजत सकाळी बारापर्यंत मिरवणुका काढल्या. गणेश मुर्तीचे प्रमुख मुर्तीकार शहरातील सांजा रोडवर असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एकंदर श्री गणेशाच्या आगमनाबरोबरच बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.