धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील येरमाळा येथील आई येडेश्वरी देवस्थानच्या विकासाकरिता आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत रु. 4.90 कोटी निधी मंजूर असून याठिकाणी करण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत दि. 7 सप्टेंबर रोजी दु 12.00 वा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. सन 2013 मध्ये त्यांच्याच प्रयत्नातून या देवस्थानाला ‌‘ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यात आला होता. देवस्थानच्या विकासासाठी यापूर्वी देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे.

मंदिरालगत वन विभागाची जागा असल्याने विभागीय वन अधिकारी औरंगाबाद यांना देखील या बैठकीसाठी आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. पालखी मार्ग रस्ता, विद्युतीकरण यासह भाविकांच्या सोयी-सुविधा व परिसर सुशोभीकरणाची कामे या निधीमधून केली जाणार आहेत.

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटणाला चालना देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवस्थानच्या विकासासाठी निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. 

सदरील बैठकीस उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, विभागीय वन अधिकारी औरंगाबाद, कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग उस्मानाबाद, अधीक्षक अभियंता महावितरण, देवस्थानचे विश्वस्त, सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असून ग्रामस्थ व भाविकांनी देखील त्यांच्या काही सूचना असल्यास सदर बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.


 
Top