नळदुर्ग (प्रतिनिधी)-शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि दुसरा शिवसेना पक्ष (शिंदे गट) पक्षामध्ये फुट पडल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये कधीच नळदुर्ग शहरात संघर्षाची स्थिती निर्माण झालेली नव्हती. मात्र सध्या या दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. त्याला कारण ठरले आहे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोर असलेल्या प्रवासी निवारा (शेडवर) लावण्यात आलेला फलक. मशाल चिन्हासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने हा फलक लावला आहे. हा फलक तात्काळ काढुन टाकण्याची मागणी शिवसेना (शिंदे) गटाने केली आहे. याबाबतचे निवेदन शिवसेना शिंदे गटाने सहाय्यक पोलिस निरीक्षक व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या स्थानिक विकास निधी सन 2016-17 च्या फंडातुन प्रवासी निवारा शेड बालाघाट शिक्षण संस्थेच्या समोर नगरपालिकेची पुर्वपरवानगी घेऊन उभारण्यात आला होता. या शेडवर माजी खासदार गायकवाड यांच्यासह हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह स्वच्छ अक्षरात लिहीलेला निवारा शेड याची मोडतोड करून त्या फलकाची विटंबना करण्यात आली आहे. हे कृत्य जाणुन बुजुन करण्यात आले असुन त्या निवारा शेडवर प्लास्टिक बॅनर छापुन त्यावर मशाल चिन्हासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असा फलक चिकटवला आहे.या घटनेचा शिवसेना (शिंदे गट) धाराशिव जिल्हा व नळदुर्ग शहर शिवसेनेने जाहीर निषेध करून हा फलक तात्काळ काढुन टाकावे त्याचबरोबर बालाघाट कॉलेज समोर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासुन हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परीणामास प्रशासन जबाबदार असेल असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख अमरराजे कदम–परमेश्वर, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, बिपीन खोपडे, तालुकाप्रमुख अभिजीत पाटील, युवासेना तालुकाप्रमुख खंडू कुंभार, तालुका प्रसिद्धीप्रमुख सुनिल गव्हाणे, नळदुर्ग शहर प्रमुख शिवाजी सुरवसे, युवासेना शहर प्रमुख अफझल कुरेशी, जेष्ठ शिवसैनिक बंडप्पा कसेकर, मनोज मिश्रा बाबु गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.