उमरगा (प्रतिनिधी)- वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांचा 2023-24 ते - या पुढील  वर्षांसाठीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात येत असून या आराखड्यामध्ये संबंधित तांडा / वस्तीवरील अत्यावश्यक कामांचा समावेश करून घ्यावा जेणेकरून भविष्यात हि सर्व कामे करून घेता येतील असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना केले. नवीन शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात मागच्या तुलनेत जास्तीचा निधी पुढील वर्षात मिळणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतुन बंजारा व इतर विमुक्त जाती, भटक्या जमातींचे वास्तव्य असलेल्या तांडा व वस्त्यांमध्ये विविध मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी दिला जातो. यात प्रामुख्याने रस्ते व गटारींची कामे प्रस्तावित केली जातात. परंतु यासोबतच व्यायामशाळा, वाचनालय, समाजमंदिर आदी कामांचा कृती आराखड्यात समावेश केल्यास त्यासाठीही निधी मंजूर केला जातो, करिता यासंदर्भातील माहिती देवून आराखड्यामध्ये अत्यावश्यक कामांचा समावेश करून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले होते.  

त्यानुसार सोमवार दि. 7 जुलै रोजी अंतुबळी पतंगे सांस्कृतिक सभागृह, उमरगा येथे तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत अनेक गावातील सरपंचांनी त्यांच्या मागण्या आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे सादर केल्या. यात प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून मंजूर असलेल्या घरकुलाची कामे सुरु होत नसलेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या या अनुषंगाने शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासित केले. 

सदर बैठकीस बी.जे.ऐरावत, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, गोविंद येरमे तहसीलदार उमरगा, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्यासह सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.


 
Top