धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून तरुणांचे आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. जेवढे प्रश्न तुम्ही सोडवाल तेवढा आपल्या पक्षाला आपल्या पार्टीला फायदा होईल. गाव तेथे युवक राष्ट्रवादीची शाखा स्थापन करून त्या शाखेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर बूथ कमिट्यांची नव्याने बांधणी करा. त्यामुळे आगामी काळातील निवडणुका सोप्या होतील, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केले.

धाराशिव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात गुरूवारी (दि.3) प्रदेश उपाध्यक्ष श्री.बाबर यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या अडचणी जाणून घेऊन आढावा घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मसुद शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सतीश एखंडे, वाजीद पठाण, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, युवक प्रदेश सरचिटणीस  प्रशांत कवडे, युवक प्रदेश सचिव रोहित बागल, शहराध्यक्ष आयाज (बबलू) शेख, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य अभिजित काळे, राष्ट्रवादी पदवीधरचे जिल्हाध्यक्ष रणजित वरपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेतृत्व करायचे असेल तर तुम्हाला या प्रवाहामध्ये असलेली पोकळी भरून काढण्याची संधी आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात शाखाचा विस्तार करून कार्यकर्त्यांना पदे देऊन काम करण्याची संधी द्यावी. पक्षात दोन गट निर्माण झालेले असले तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हाच मूळ पक्ष आहे. तर अजितदादांचा स्वतंत्र पक्ष नसून तो गट आहे, हे कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवून काम करावे. राष्ट्रवादी युवक कॉंगे्रसची नूतन जिल्हा व तालुका कार्यकारिणी लवकरच निवडण्यात येणार असून इच्छुकांनी जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार समजून घेतले पाहिजे. पक्षाची विचारधारा समजून काम केले पाहिजे. तरच पक्ष पुन्हा पहिल्या क्रमांकावर येईल, असे मत राष्ट्रवादी प्रवक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष तुषार वाघमारे यांनी व्यक्त केले. उपस्थित पदाधिकार्‍यांनीही यावेळी आगामी वाटचालीसंदर्भात सूचना मांडल्या. बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top