धाराशिव (प्रतिनिधी)-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानचे आयोजन करण्यात आलेले आहे. 28 जुलै 2023 रोजी परंडा येथून सुरू झालेल्या या अभियानची सांगता शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 रोजी तुळजापूर येथे होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी मंगळवारी (दि.1) पत्रकार परिषदेत दिली.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत समुद्रे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी या अभियानाची सुरुवात केलेली आहे. हे अभियान धाराशिव जिल्ह्यातही राबविण्यात येत आहे.अभियानच्या सांगता समारंभास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी पक्षाध्यक्ष रविकांत तुपकर, उच्चाधिकार समितीचे प्रकाश पोपळे, युवती महिला आघाडीच्या अध्यक्ष पूजाताई मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रा.डॉ.बिभीषण भैरट, मराठवाडा युवा अध्यक्ष गोरख भोरे यांची प्रमुख उपस्थिती 4 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष इंगळे यांनी सांगितले.


एफआरपीसाठी शेतकर्‍यांनी पुढे यावे

जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अद्याप दिलेली नसल्याच्या तक्रारी आहेत. एफआरपीच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे लेखी तक्रारी दिल्या पाहिजेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम सोबत आहे, असे पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितले.


 
Top