धाराशिव ( प्रतिनिधी) -जिल्ह्यातील विविध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील कृषी, आरोग्य,सिंचन क्षेत्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून देतांना विविध योजना,प्रकल्प,उपक्रम व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाहोरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना ते बोलत होते.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुवासाहेब जाधव,सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे,उपजिल्हाधिकारी संतोष भोर, राजकुमार माने व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की,17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे.हे वर्ष मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी विविध हुतात्मा स्मारक बांधकाम,सुशोभिकरण व स्मृतीस्तंभ बांधकाम करण्यासाठी मंजूर केला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या व शहराच्या विकासाचा आराखडा 1100 कोटींचा करण्यात येत असल्याचे सांगून प्रा.डॉ. सावंत म्हणाले की, या विकास आराखड्याने तुळजापूर शहराचा चेहरा-मोहराच बदलून जाणार आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधीत शेतकऱ्यांना 137 कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करुन दिल्याचे सांगून प्रा.डॉ.सावंत म्हणाले, तो निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम 2022 मध्ये 5 लाख 19 हजार 662 शेतकऱ्यांना 352 कोटी 77 लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात आली.या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पिक विमा योजना सुरु केली आहे.शेतकऱ्यांना प्रति अर्ज 1 रुपया भरून योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे.जिल्ह्यातील 7 लाख 57 हजार 557 शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून या योजनेत सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे.आता नवीन जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयांना देखील मंजुरी देण्यात आली आहे.या जिल्हा रुग्णालयासाठी जमीन संपादित करून त्या जागेवर नवीन जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तसेच पदनिर्मितीबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल.परंडा येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय तसेच 50 खाटांवरुन 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजूरी देण्यात आली आहे.
यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक,पत्रकार बांधव, नागरिक व विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हणमंत पडवळ यांनी केले.