धाराशिव (प्रतिनिधी)-केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सोलापूर डिव्हिजन मधील उस्मानाबादसह 15 रेल्वे स्थानकाचा या योजनेसाठी समावेश झाला आहे. उस्मानाबादच्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाठी 21 कोटी 72 लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून रेल्वेस्थानकाचा पायाभूत विकास कार्यक्रमाचा शुभारंभ रविवार 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. 

उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी 9 पासून यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन रेल्वे स्थानक पुनर्विकास कामाचा प्रारंभ होणार आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, पार्किंग क्षेत्र, मार्ग,  दर्शनी भागात किल्ला व लेण्यांच्या शिल्पाकृती, प्रवेशद्वार आणि दरवाजे, दर्शनी भाग यांची उंची वाढविणे, स्वच्छतागृह, 12 मीटर रुंद फूट-ओव्हर-ब्रिज, दिव्यांगासाठी रॅम्प, ड्रेनेजची कामे,  प्लॅटफॉर्म वर पूर्ण शेड मारणे, प्लॅटफॉर्म सर्फेसिंग, विद्यमान स्टेशन इमारतीचे नूतनीकरण, इलेक्ट्रिकल काम, साइनेज बोर्ड, कोच इंडिकेटर आदी कामाची समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्री यांच्या समवेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, दुसर्‍या रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 


 
Top