धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ बाबासाहेब घुले यांना बेदम मारहाण करणार्या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आज (दि.3) निवेदनाद्वारे केली आहे. आरोपीला अटक न झाल्यास सोमवार, 7 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले की, तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.नवनाथ घुले यांना दि. 1 ऑगस्ट रोजी गावगुंडांनी घेराव घालून अरेरावीची भाषा वापरून बेदम मारहाण केली. प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही तीन दिवस काळ्या फिती लावून कामकाज करू व त्यानंतरही कारवाई न झाल्यास सोमवार, 7 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवा वगळून कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर रूग्णसेवेवर परिणाम झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या आंदोलास एनआरएचएम संघटना आणि आशा संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेश गुरव, सचिव डॉ.रोहीत राठोड, डॉ.एन.के. गुंड, डॉ.सचिन पाटील, डॉ.सी.आर. बडे, डॉ.प्रवीण घंदुरे, डॉ. राजेश गाडे, डॉ.एस.डी. मुंढे, डॉ.व्ही.व्ही. सातपुते, डॉ.विनयशील कुलकर्णी, डॉ.सुजित राऊत, डॉ.श्याम पाटील, डॉ.एम.एस. बेंबळगे, डॉ.नौमान शेख, डॉ.एस.एस. जाधव, डॉ.शिंदे, डॉ.माने, डॉ.चाळक, डॉ.मेंढेकर, डॉ.घाडगे, डॉ.आयवळे, डॉ.पुंडे, डॉ.चव्हाण, युनानी डॉक्टर्स संघटनेचे डॉ.शकील अहमद खान तसेच श्री.बारकुल, श्री.गवळी, श्री.गिरी आदीसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.