धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याच्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात येते. 31 जुलै पर्यंत 7 लाख 33 हजार 902 अर्ज ऑनलाईन झालेले आहेत. पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्यांस टाळता न येण्याजोग्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळते.
हंगाम कालावधीत अपुर्या पावसामुळे पेरणी, लावणी होऊ न शकलेले क्षेत्र, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, पावसातील खंड, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगाचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, अवेळी पाऊस आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणार्या जोखमींमुळे नुकसान झालेल्या अधिसुचित पिकांना विमा संरक्षण दिले जाते. शेतकर्यांनी विमा योजनेत विमा घेतलेले पीक व पेरलेल्या पिकाच्या क्षेत्रासंदर्भात भविष्यात समस्या उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येते. त्यामुळे शेतकर्यांनी शेतात जे पीक पेरणी केलेले आहे व त्याचा पीक विमा भरलेला आहे अशा पिकांची ई-पीक पाहणीमध्ये नोंद घ्यावी.
ई-पीक पाहणी करण्याकरिता मोबाईल मधील Play Store मधील ई-पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे व जुने ॲप असल्यास ते Uninstall करावे. ॲप चालू केल्यानंतर प्रथम औरंगाबाद विभाग निवडावा, त्यानंतर मोबाईल क्रमांक नमूद करुन जिल्हा, तालुका निवड करुन त्यानंतर ज्या गावात ई पीक पाहणी करायची आहे ते गाव निवडावे. त्यानंतर खातेदार नोंदणी करण्यासाठी सात बारा व आठ अ नुसार सर्वे क्रमांक, पोट हिस्सा क्रमांक, खाते क्रमांक आदी नमूद करुन पिकाचा प्रकार, पिकाचे नाव, पिकाच्या क्षेत्राची नोंद करुन ई-पीक पाहणी करावी. ई पीक पाहणीच्या ॲप मध्ये प्रत्येक बाबीसाठी पर्याय दिलेले आहेत. शेतकर्यांनी आवश्यक ते पर्याय निवडून सबमिट करावे. सबमिट केल्यानंतर अपलोड झाल्याबाबत मेसेज आल्यानंतर पिकांची माहिती पहा या कॉलममध्ये शेतकर्यांनी भरलेली माहिती पाहता येईल.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतकर्यांनी पीक विमा भरलेला आहे. शेतकर्यांनी ई-पीक पाहणीच्या अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतात जे पीक पेरणी केलेले आहे व त्याचा पीक विमा भरलेला आहे अशा पिकांची आत्ताच ई-पीक पाहणीमध्ये नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.