धाराशिव (प्रतिनिधी)-सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी 544 कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. 30 महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली होती. दिलेला शब्द खरा करून दाखवत तुळजाभवानी देवीच्या चरणी पंतप्रधान मोदी यांनी सेवा रूजू केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
ठाकरे सरकारच्या अनास्थे मुळे रखडलेल्या या रेल्वे मार्गाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या 84 कि.मी लांबीच्या रेल्वेमार्गावर एकूण 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 32 गावांतील एक हजार 375 एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील 15 गावांमधील 494.26 हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी 452.46 कोटी रूपयांच्या निधीला तत्काळ मंजुरी देण्यात आली व पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे.