धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात रस्त्याच्या कडेला जिथे कुठे जागा मिळेल अशा ठिकाणी वाढदिवस व इतर बॅनर मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी नियमबाह्यपणे बॅनर लावून चौकाचे विद्रूपीकरण केले जात आहे. हे थांबवून महापुरुषांच्या चौकात  मीटर अंतरच्या आतमध्ये यापुढे एकही बॅनर लागणार नाही. तसा निर्णय घेतला असून सर्व महापुरुषांचे चौक बॅनर मुक्त करणार असल्याची माहिती उस्मानाबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दिली.

धाराशिव शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आदींसह इतर सर्व महापुरुषांचे चौकामध्ये वाढदिवस जयंती व इतर विविध धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर लावले जात आहेत. विशेष म्हणजे महापुरुषांच्या पुतळ्यापेक्षा बॅनर मोठे लागत असून हे नियमबाह्य आहे. तर शाळा महाविद्यालय त्याबरोबरच एखाद्याच्या वैयक्तिक घरासमोर किंवा घरावर बॅनर लावण्याचे प्रकार देखील सर्रास दिसून येत आहेत. या बॅनरमुळे महापुरुषांचा तर अवमान होतोच. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा जिथे मोकळी जागा दिसेल तिथे बांबू उभा करून त्याला बॅनर लटकविण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून नूकताच निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रती स्के. फूट 75 पैसे दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे 10 बाय 10 चा बॅनर 3 दिवस लावण्यासाठी 105 रुपये तर हा बॅनर जास्तीत जास्त 7 दिवसांपर्यंत लावता येतो.  त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. मात्र शासकीय योजनेची माहिती जनतेला व्हावी यासाठी लावलेल्या बॅनरसाठी कालावधी निश्चित नाही. कारण या माध्यमातून शासनाने घेतलेल्या जनतेच्या हिताच्या निर्णयाची माहिती जनतेच्या भल्यासाठी मिळणे आवश्यक असते. यापुढे एक देखील बॅनर बारकोड शिवाय शहरांमध्ये झळकणार नाही. जर एखादा बॅनर नियमबाह्य पद्धतीने कोणी लावला तर त्याच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे फड यांनी सांगितले. 

................................................

बॅनर लावण्यासाठी शहरांमध्ये पॉईंट फिक्स करण्यात येत आहेत. त्या व्यतिरिक्त इतरत्र बॅनर लावायचे असतील तर त्यासाठी नगर परिषदेची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच शहरामध्ये काही ठिकाणी बॅनर लावण्यासाठी अनधिकृतपणे मनोरे उभे केलेले आहेत. ते मनोरे धोकादायक असल्यामुळे ते केव्हाही कोसळू शकतात. असाच जिजामाता उद्यान नजीक उभा करण्यात आलेला मनोरा धोकादायक असून तो तात्काळ हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अनधिकृत् ठिकाणी बांबू उभे करून त्यावर बॅनर लावले जात असून ते बांबू जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याचे श्रीमती फड यांनी सांगितले.

 
Top