धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस अधिक्षक कार्यालय आणि वाशी तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अदिवासी दिना निमित्त जनजागृती शिबीर उद्या शनिवार, दि. 12 ऑगस्ट, 2023 रोजी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील सुहासिनी मंगल कार्यालयात सकाळी 10.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा मुंबई यांच्या निर्देशानुसार धाराशिव प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा ए. एस. शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश1 आर. एस. गुप्ता, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश, वाशीचे तहसिलदार नरसिंग जाधव, वाशीचे गट विकास अधिकारी एन. पी. राजगुरु यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून कायदेशीर जनजागृती शिबीर, आयुर्वेदिक महाविदयालय यांच्या मार्फत आरोग्य तपासणी, मोफत डोळे व दंत तपासणी शिबीर तसेच रेशन कार्ड, शिधापत्रिका वाटप व घरकुल मंजूरी आदेशाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. तरी या शिबाराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.एस.यादव यांनी केले आहे.   

 
Top