तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी या विषयावर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ धनराज माने, संचालक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राज्य यांनी वरील प्रतिपादन केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे ते म्हणाले की, काळानुरूप शैक्षणिक संकल्पना बदलत असतात, पूर्वी शिक्षण व्यवस्था ही पारंपरिक पद्धतीने चालत असायची, गुरुकुल पद्धतीने शिक्षण पद्धतीचा प्रारंभ झाला तेंव्हा त्या काळात ती सर्व श्रेष्ठ होतीच, आधुनिक काळात ज्ञानाच्या कक्षा वाढत आहे किंबहुना त्या स्पर्धेच्या युगात गरजेच्या आहेत, विज्ञानवादी युगात बुध्दीचा आहार वाढला आहे,या आहारात वेगवेगळे विषय आपल्या समोर आहेत, आपल्या आवडीनुसार या बौद्धिक आहारातील आपला आवडता व पोषक आहार आपण घेणे गरजेचे आहे. नविन शैक्षणिक धोरणानुसार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील महाविद्यालयाने नॅकचे अ मानांकन प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मणेर यांच्या सह सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन देखील केले.सदर प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदाशी नवीन शैक्षणिक धोरणांविषयी शेवटी त्यांनी संवाद ही साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 5+3+3+4 अशी नविन संरचना निश्चित करण्यात आली आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पहिली पाच वर्ष यामध्ये पूर्वप्राथमिक,आणि पहिली व दुसरी इयत्तेचा देखील समावेश असणार आहे,1968 मध्ये सर्व प्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्माण करण्यात आले. 1986 मध्ये दूसरे शैक्षणिक धोरण निर्माण केले गेले आणि 1992 मध्ये सुधारणा करण्यात आल्या, तब्बल 34 वर्षांनंतर नविन शैक्षणिक धोरण निश्चित करण्यात आले. एन इ पी 2020 हे 21 व्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे,प्रवेश ,समानता, गुणवत्ता,परवडणारी क्षमता आणि उत्तरदायित्व या मूलभूत स्तंभावर हे नविन शैक्षणिक धोरण आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे भारताला जागतिक महासत्ता बनवणे हा प्रमुख उद्देश नविन धोरणाच्या माध्यमातून पूर्ण होईल असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशपाक आतार यांनी केले. तर आभार डॉ. बी. डब्ल्यू. गुंड यांनी मानले.सदरवेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top