तुळजापूर (प्रतिनिधी)- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या आई तुळजाभवानी दर्शनासाठी दाही दिशांहून येणार्‍या भाविकांची रोजच गर्दी असते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला तर दुपटीचे भाविक येतात. मात्र शहर वाहतूक आणि महामार्ग पोलिसांकडून खाजगी वाहनातून आलेल्या भाविकांना वाहन परवाना, पीयुसी, इन्शुरन्स आदी कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली दंडाच्या पावत्या कमी मात्र विनापावतीच आर्थिक लूट जास्त होत असल्याची खंत काही भाविकांनी  प्रतिनिधीशी बोलताना व्य्नत केली. त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याचेही सांगितले.

सोलापूर-पुणे-मुंबईसह, कर्नाटक, आंध्रातून अनेक भाविक सोलापूर-तुळजापूर महामार्गावरून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी रोज ये-जा करतात. काहीजण बसेसद्वारे जातात तर काहीजण खाजगी वाहने भाड्याने करून जातात. चारचाकीने येणार्‍या भाविकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांच्याकडूनही एकच विचारणा होते...लायसन आहे का....पीयुसी...इन्शुरन्स पेपर वगैरे विचारतात...सर्वच पेपर क्लिअर असले तरी हेड लाईट लावा...ब्रेकलाईट चालू आहेत का...आदींची पाहणी केली जाते. यातील एखाद्या तरी गोष्टीत कमतरता भासली की, 2 किंवा 5 हजाराचा ऑनलाईन दंड मारतो. अशी भीती दाखविली जाते. 

इतके पैसे नाहीत म्हटल्यावर 100, 200, 500 रूपये घ्यायचे आणि वाहन सोडायचे. असा दिनक्रम वरील ठिकाणच्या काही पोलिसांचा आहे. इतकेच नाही तर तामलवाडी टोलनाक्यावर महामार्गा पोलिसांचा वसुलीचा कहरच आहे. तामलवाडी पोलिस स्टेशनचे काही पोलिस टोलच्या अलीकडे कधी-कधी थांबतात...त्यांचा व्यवहार संपला की, यानंतर टोलच्या पुढे लगेच महामार्ग पोलिस थांबतात.म्हणजे एकाच गावात 1 टोल आणि दोन ठिकाणी भाविकांना पोलिसांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतकं सारं संपत नाही तोवर कधीकधी तुळजापूर शहर वाहतूक पोलिसही घाटशीळच्या खाली उड्डाण पुलाखाली वाहन तपासणी करतात. त्यांचाही वेगळाच त्रास होतो. याच पध्दतीने नळदुर्ग, धाराशिव, बार्शी या मार्गावरूनही येणार्‍या भाविकांकडून असा आर्थिक त्रास होत असल्याने येणार्‍यां भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज 

तुळजापूरचा पर्यटन विकास आणि आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जास्तीच्या सोयी देण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सतत प्रयत्नशील असतात. मात्र शहर वाहतूक व महामार्ग पोलिसांकडून भाविकांची अशी नित्याने आर्थिक लूट होत असेल तर वरील लोकांच्या प्रयत्नांचा काहीही फायदा होणार नाही.


 
Top