धाराशिव (प्रतिनिधी)-विभागीय आयुक्तांच्या सुचनेनुसार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना अध्यापन करणार्या शिक्षकांसाठी 30 व 31 जुलै रोजी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन या परीक्षेवर बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे रविवारी (दि.30) सर्वच केंद्रांवर एक-दोन शिक्षक वगळता कोणीही फिरकले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शासनाचा परीक्षेासाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याचे म्हटले जात आहे.
शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकाची क्षमता अधिक विकसित व्हावी या उद्देशाने मराठवाड्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांकरिता या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा ऐच्छिक असल्याने काही शिक्षकांनी ऑनलाइन अर्जही भरले. मात्र त्यानंतर विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन या परीक्षेवर बहिष्कार घातला. त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 15 पैकी काही केंद्रावर दोन-तीन शिक्षक वगळता कोणीही फिरकले नसल्याचे चित्र होते. दरम्यान, या परीक्षेचे गुणही जाहीर करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या परीक्षेचा नेमका उद्देश काय? असा सवाल काही शिक्षकांनी उपस्थित केला आहे.