धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने उत्कृष्ट कार्य करीत महसुल उदिष्ट प्राप्तीसह विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. अपघातमुक्त प्रवास, रस्ता सुरक्षा,ऑनलाईन सेवा सुविधेला प्राधान्य दिले असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली.

सहायक उपप्रादेशिक अधिकारी राहुल जाधव, मोटार वाहन निरीक्षक भालचंद्र रूपदास,प्रसाद पवार,प्रशांत भांगे, प्रियदर्शनी उपासे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अजिंक्य डुबल,कुणाल होले, कुलदीप पवार, अजित पवार, कार्यालयीन कर्मचारी डी के लोंढे,नरसिंग कुलकर्णी, आर. जी. कुलकर्णी, आर. जी. नाईकवडे व सहकारी यांनी विविध उपक्रम राबवित जबाबदारी पार पाडली.

2022-23 या आर्थिक वर्षात 76 कोटी 53 लाख रुपयांचे महसूली उद्दिष्ट असताना 76 कोटी 90 लाख म्हणजे 103.42 टक्के महसूल विविध मार्गाने जमा केला आहे. विविध उपाययोजना व जनजागृतीच्या माध्यमातून जानेवारी 2023 ते मे 2023 या काळात अपघाताचे प्रमाण कमी झाले असुन अपघातात 7.96 टक्के तर मृत्यूसंख्येत 19.10 इतकी घट झाली आहे. रस्ता सुरक्षेचे 11 हजार 236 जणांना प्रशिक्षण देत रस्ते, वाहन व सुरक्षित चालक घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

वायूवेग पथकामार्फत क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करुन 390 वाहनाकडुन 1 कोटी 20 लाख दंड वसुल करण्यात आला. तर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या 289 वाहनाकडून 5 लाख 60 हजार दंड वसुल केला. मोटार वाहनाचे उल्लंघन करणार्‍या वाहनाकडून 1 कोटी 4 लाख असा 2 कोटी 31 लाख दंडाची वसुली करण्यात आली. नवीन नोंदणी वाहनधारकाकडुन 10 कोटी 43 लाख तर आकर्षक पसंती क्रमांक वाहनाना देऊब 1 कोटी 50 लाख महसूल प्राप्त केला आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली.


 
Top