धाराशिव (प्रतिनिधी)-परवा पाटण्यात देशातील तिसर्या आघाडीची बैठक घेण्यात आली. ही बैठक प्रधानमंत्री मोदी यांना निवडणुकीत हरविण्यासाठी होती. पण बैठकीत मात्र लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय काढला. त्यामुळे ही बैठक राहुल गांधींचे लग्न जमविण्यासाठी होते का? असा प्रश्न उपस्थित करून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी कॉंग्रेस पूर्वी आम्हाला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असे विचारत होते. परंतु आज तिसर्या आघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण त्यांनी जाहीर करावे. त्यानंतर मात्र आघाडीत बिघाडी होते. त्यामुळे देशात तिसरी आघाडी कधीच यशस्वी होत नाही अशी टिका दानवे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्य्नत केली.
मंत्री दानवे-पाटील बुधवार दि. 28 जूनच्या रात्री पंढरपूरहून खास रेल्वे गाडीने धाराशिवला आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी राजकारणात विचाराची लढाई असते. एका विचाराने बैठक होत असते. परंतु तिसर्या आघाडीत सगळेच एकमेकांना शिव्या देतात. त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? त्यांनी जाहीर करावे. उध्दव ठाकरे सध्या 19 जागा पाहिजेत म्हणून अडून बसले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी का यशस्वी होत नसते असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालु्नय, संतोष बोबडे, अॅड. अनिल काळे,राहुल पाटील, सतीश दंडनाईक आदी उपस्थित होते.
माझ्या उमेदवारीची खात्री नाही
यावेळस पत्रकारांनी धाराशिव जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून, जिल्ह्यात कोणाला उमेदवारी मिळेल असे विचारले असता मंत्री दानवे-पाटील यांनी जालन्यातून परत मलाच उमेदवारी मिळेल का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या येथील काय उमेदवारी बाबत का सांगू ? असे म्हणून उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपची केंद्रीय मध्यवर्ती समिती आहे. ते उमेदवार निश्चित करतात असे सांगितले.