धाराशिव (प्रतिनिधी)- सासरच्या मंडळीच्या छळामुळे त्रस्त विवाहितेकडे तसा अहवाल देण्यासाठी 6600 रूपयांची लाच घेणार्‍या कळंब येथील महिला समुपदेशकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.

कळंब तालुक्यातील एका विवाहितेला (23) त्यांचे पती व सासरचे मंडळी हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते्र त्यांच्या विरूध्द पोलिस ठाण्यात विवाहितेस गुन्हा दाखल करायचा होता. यासाठी विवाहितेस समुपदेशन कार्यालयाचा अहवाल आवश्यक होता. म्हणून यातील विवाहितेने पंचायत समितीमधील तुळजाभवानी जनविकास समाजिक संस्थेच्या (मोहा, ता. कळंब.) महिला समुपदेशन व मदत केंद्रात तक्रारी अर्ज दिला होता. विवाहितेला तिच्या बाजूने कळंब पोलिस ठाणे येथे व न्यायालयात अहवाल पाठवण्याकरिता महिला समुपदेशक नीता सुनिल गायकवाड (वय 37, रा. कल्पना नगर, कळंब) यांना विनंती केली. परंतु गायकवाड यांनी लाचेची मागणी केली. यामुळे विवाहितेने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तेव्हा मंगळवारी सापळा लावण्यात आला. यामध्ये पंच व साक्षीदारांसमक्ष सोमवारीच शुल्काच्या नावाखाली पूर्वी एक हजार रूपये स्विकारल्याचे मान्य करून 6600 लाचेची मागणी केली. तसेच तेथेच लाच स्विकारताच नीता गायकवाड यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबीचे पोलिस उपाधीक्षक सिध्दराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर यांनीही कारवाई केली.


 
Top