धाराशिव (प्रतिनीधी) ः- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम  सन 2023-24 मधील उद्दिष्टपूर्तीच्या नियोजनासाठी आढावा बैठक दि. 18 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,  येथील सभागृहात  जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होतेसुरुवातीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  अमोल बळे यांनी बैठकीस उपस्थित  जिल्हाधिकारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी यांचे स्वागत केले व सन 2023-24 यावर्षी प्राप्त असलेल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी नियोजन विशद केले. यावेळी योजनेची माहिती देताना प्रकल्प मर्यादा, देय अनुदान, तसेच लागणारी कागदपत्रे व संभाव्य उत्पादन व सेवा उद्योगांची यादी यांची माहिती दिली.  ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरताना घेण्यात यावयाची खबरदारी याबाबतची माहिती दिली. सदर योजनेमध्ये 35 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी उपस्थित संघटनांच्या सर्व पदाधिकार्‍यांशी संवाद साधून येणार्‍या अडचणी विषयी माहिती घेतली. बँकांच्या सहकार्याने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ती होईल अशी आशा व्यक्त केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी हातभार लावावा असे आवाहन  जिल्हाधिकारी  यांनी केले. योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असून https://mahacmegp.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद येथे संपर्क साधावा.


 
Top