धाराशिव / प्रतिनिधी-

आपले शहर कसे असायला हवे याबाबत अनेकांकडे मौलिक दृष्टी असते. ही मौलिक दृष्टी, महत्वपूर्ण सूचना आणि नागरिकांच्या रास्त अपेक्षांच्या बळावरच शहराचा चेहरामोहरा बदलण्याची सकारात्मक मोहीम आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हाती घेतली आहे. त्यासाठी शहर विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांच्या सूचना, गरजा व संकल्पना मुख्याधिकारी यांच्याकडे महिनाअखेर पर्यंत लेखी सादर कराव्यात, यावर त्यातून शहर विकासाचा व्यापक आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

 राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत येताच वेगाने विकास कामे मार्गी लागत आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले जिल्ह्यातील महत्वाचे मोठे प्रकल्प मागील सहा-आठ महिन्यात मार्गी लागले आहेत. शहर विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी  फडणवीस यांनी आश्वासित केले आहे. त्या अनुषंगाने शहर विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्याच्या सूचना पालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. 

 जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब, नळदुर्ग, व वाशी या शहरांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये शहरवासीयांच्या मौलिक सूचना, रास्त अपेक्षा व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण संकल्पना लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

 या सर्व सूचना, अपेक्षा व महत्वपूर्ण संकल्पनांच्या अनुषंगाने महिनाअखेर संबंधित शहरांमध्ये सर्वसमावेशक बैठक घेतली जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. या विकास आराखड्यामध्ये नऊ मीटरच्या पुढील रस्त्यांची सुधारणा करणे, उद्यान विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, भुयारी गटार, पाणीपुरवठा आदी महत्वाच्या कामांचा समावेश असणार आहे. शहर विकासात स्थानिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या सूचना व संकल्पनांचा समावेश शहर विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नागरिकांनी शहर विकासाबाबतच्या त्यांच्या सूचना व संकल्पना पुढील 15 दिवसात लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.


 
Top