तुळजापूर (प्रतिनिधी) :-  उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही फेरमोजणीची नोटीस देऊन शेतकर्यांची क्रूर थट्टा करणार्या सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवार, 24 मे रोजी नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तुळजापूर तहसिलदारांना देण्यात आले. शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गावरील बाधित शेतकर्यांनी मागणीचे निवेदन तुळजापूर तहसिलदारांना देण्यात आले. नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीत करण्यात आलेल्या संयुक्त मोजणी व तुळजापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षकांनी उपविभागीय अधिकार्यांकडे सादर केलेल्या अहवालाप्रमाणे शेतकर्यांचे मालकी हक्काचे क्षेत्र रस्त्याच्या कामासाठी बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला नवीन कायदा व प्रचलित दराप्रमाणे व्याजासह देऊन शेतकर्यांना लवकरात लवकर बाधित क्षेत्राचा मावेजा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समावेश असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी कुटुंबीयांचा आयुष्मान भारत योजनेत समावेश करण्यात यावा, तुळजापूरचे भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीत संयुक्त मोजणी अहवाल सादर केलेला असताना शेतकर्यांना फेरमोजणीसाठी पुन्हा नोटिसा देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जात आहे. त्यामुळे भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन वाडकर यांनी अशा प्रकारच्या नोटिसा देऊन शेतकर्यांना नाहक त्रास देणे बंद करावे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शेळके (सोलापूर) यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देताना शेतकरी क्रूर असल्याचे नमूद करत शेतकर्यांमुळे अधिकार्यांची शारीरिक हानी होत असल्याचा आरोप दिशाभूल करणारा आहे. याचीही चौकशी करून शेतकर्यांना नाहक बदनाम करणार्या अभियंत्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा 24 मे 2023 रोजी राष्ट्रीय महामार्ग 65 वर नळदुर्ग येथील बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी, उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, नानासाहेब पाटील, विद्याधर मोरे, अब्दुल शेख, नेताजी काळे, काशिनाथ काळे, लक्ष्मण निकम, संजय व्हंताळे, अजमुद्दीन शेख, गवळणबाई व्हंताळे, सैफन मुल्ला, गफुर मुल्ला, महादेव बिराजदार, गणपत सुरवसे, तोलू पटेल, सरफराज शेख, व्यंकट पाटील, दयानंद कल्याणशेट्टी, प्रशांत शिवगुंडे, दयानंद लोहार, राजेंद्र पवार, बंडू मोरे, बालाजी ठाकुर, प्रतापसिंग ठाकुर, बाबुसिंग राजपूत, श्रीकांत पवार, नीलकंठ पाटील, महेश घोडके, वीरूपाक्ष माशाळकर, शंंकर कलकोटे, गणपती कलकोटे, जैनु जमादार व इतर शेतकर्यांची स्वाक्षरी आहे.


 
Top