धाराशिव / प्रतिनिधी-

 देशी बनावटीचे पिस्तुल व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या चिलवडी ता. धाराशिव येथील एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिखली येथून ताब्यात घेतले. ही घटना 16 एप्रिल रोजी दुपारी घडली.

पोलिसांनी सांगितले की, स्थानिक गुन्हे शाखा पथकास गुप्त माहिती मिळाल्यावरून चिखली चौरस्ता ता. धाराशिव येथे 16 एप्रिल रोजी दुपारी सापळा रचण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एका तरूणाला ताब्यात घेतले. त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने किशोर लिंबराज माळी , (वय 34) रा. चिलवडी, ता. धाराशिव असे सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ 15 हजार 500 रूपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करुन त्याचेविरुध्द बेंबळी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार विनोद जानराव, फराहान पठाण या पथकाने केली.

 
Top