धाराशिव / प्रतिनिधी-

 आधुनिक भारताची जडणघडण करण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले यांनी क्रांतिकारी सुरूवात केली. सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून मानवी मुल्यांचे बीज रोपण केले. भारतीय संविधानात सार्वजनिक सत्यधर्माचा सारांश सामावलेला आहे. क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अनन्य साधारण असल्याचे मत पत्रकार रवींद्र केसकर यांनी व्यक्त केले.

शहरातील कुरणे नगर भागात फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त शाक्यसम्राट प्रतिष्ठानच्यावतीने आपलं वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदेश माळाळे तर प्रा. डॉ. रत्नाकर मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना केसकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन उपास्य दैवते आणि तीन गुरू सांगितले आहेत. बाबासाहेबांच्या तीन गुरूंपैकी महात्मा ज्योतीबा फुले हे एक. मानवी मुल्यांचा आग्रह या तिन्ही गुरूंकडून बाबासाहेबांनी आत्मसात केले. तोच आपल्या जीवन प्रक्रियेचा भाग बनविला. त्यामुळेच दलीत शोषित, वंचित समाजाबरोबर देशभरातील सवर्ण समाजाच्या देखील अनेक मुलभूत प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली. जलतज्ञ, कृषीतज्ञ, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, अशा अनेक रूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संशोधन आजही देशाला पथदायी असेच आहे.

प्रारंभी प्रास्ताविक मनोगतातून प्रा. रत्नाकर मस्के यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. अध्यक्षीय समारोपात सुदेश माळाळे यांनी जयंतीच्या उत्सवात अलीकडील काळात निर्माण झालेले अवडंबन बाजूला सारून महापुरूषांच्या विचाराचा आदर्श जोपासने सर्वांचे कर्तव्य असल्याचे नमुद केले. सूत्रसंचालन महादेव कांबळे यांनी केले. आभार किरण गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश वाघमारे, संजय दणाने, हर्षल डावकरे, धम्मदिप सवई, बाबासाहेब लोंढे, नितीन माने, अनिकेत झेंडे, यश कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 
Top