धाराशिव / प्रतिनिधी-

 शहराच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून टप्याटप्प्याने तो नागरिकांच्या समोर मांडण्यात येईल. यामध्ये शहरात ५ उद्यान उभारण्यात येणार असून शहरातील विकास कामे करताना नागरिकांच्या सूचनांचाही यामध्ये प्राधान्याने विचार करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना मांडून शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१६ एप्रिल रोजी केले. 

धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, सुनील काकडे आधी उपस्थित होते.  पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, धाराशिव शहर विकासाठी २०० कोटी रुपयांपैकी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समिती व राज्य सरकारकडून हा निधी उपलब्ध झाला आहे. रस्ते, नाल्या व इतर कामे दर्जेदार व्हावीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. शहरात पहिल्या टप्प्यात २ उद्यान उभारण्यात येणार आहेत. एसटी क्वार्टर परिसरातील पोलीस दलाच्या जागेत उद्यान उभारण्यासाठी ३ कोटी ७१ लक्ष तर धारासूर मर्दिनी मंदिराजवळ उद्यान उभारण्यासाठी १ कोटी ८० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अन्य ३ ठिकाणी उद्यान उभारण्याचा पूर्वीच्या प्रलंबित निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. उद्यानांचे शहर अशी धाराशिवची नवी  ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उद्यान उभारण्याच्या संदर्भात नागरिकांनी सूचना द्याव्यात. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १५० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नजिकच्या काळात २०० कोटीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात येईल. शहरात उद्यान, शौचालय, नाट्यगृह, जिल्हा रुग्णालयात एमआरआयसह अन्य सुविधा, आणखी एक क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा यासह वेगवेगळ्या क्षेत्रात शहराचा विकास करण्यात येईल. यासाठी वेगवेगळ्या कोअर टीम तयार करून त्यांना या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून  विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.शहराच्या विकास प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी होवून सूचना मांडाव्यात, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.

 
Top