धाराशिव / प्रतिनिधी-

 शेताला जाण्यासाठी वडिलोपार्जित असलेला शेत रस्ता एका गुंड शेतकऱ्याने आडवीला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी तहसीलसह इतर ४ कार्यालयाने हा शेत रस्ता खुला करण्यात यावा असा न्याय दिलेला आहे. मात्र तो रस्ता अद्यापपर्यंत खुला केलेला नाही. तर तो गुंड शेतकऱ्यांना व महिलांना वारंवार मारहाण देखील करीत आहे. याची पोलीस ठाण्यात देखील दात घेतली जात नाही. त्यामुळे वैतागून गेलेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.३ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

धाराशिव तालुक्यातील दाऊतपुर (ईर्ला ) येथील अजिनाथ विश्वनाथ पांढरे, नामदेव विश्वनाथ पांढरे, साहेबराव विश्वनाथ पांढरे, छाया साहेबराव पांढरे, कलावती अजिनाथ पांढरे व सखुबाई नामदेव पांढरे यांची शिवारामध्ये शेतजमीन गट नं. १०७, १०८ व ११६ असा आहे. या शेतासाठी जाण्यास शेतजमीन गट नं. १७३, ११६, १०७ व ११७ च्या सर्वे नंबरवरून वडिलोपार्जित शेत रस्ता होता. मात्र भास्कर देविदास देवकर, दगडू देविदास देवकर, जगदीश भास्कर देवकर, मंगेश भास्कर देवकर व भागाबाई दगडू देवकर यांनी हा रस्ता आडविला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी असलेला सर्वे नंबर पूर्णपणे ट्रॅक्टरच्या नांगराने नागरून टाकलेला आहे. त्यामुळे जाण्या येण्यासाठी रस्ता शिल्लक नाही. शेताकडे पायी जात असताना ही मंडळी पुरुषांना व महिलांना देखील सतत मारहाण करीत आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल करण्यास गेले असता संबंधित पोलीस ठाण्याची अधिकारी तुमचा कागद जाळून टाका असे सांगून आम्हाला हाकलून देतात. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी पंचनामा करून तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या ४ कार्यालयाचे हा रस्ता खुला करावा असे आदेश आहेत.  असे आदेश असताना देखील देवकर मंडळी या रस्त्यावर अतिक्रमण करून आम्हाला जाऊ देत नसल्याचा आरोप आमरण उपोषणास बसलेल्या महिलांनी केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या अन्यायग्रस्त महिला व पुरुष शेतकऱ्यांना न्याय केव्हा देणार ? असा टाहो वृद्ध शेतकरी फोडीत आहेत.


 
Top