धाराशिव / प्रतिनिधी-

महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने विविध कार्यालयात पदभरतीचा शासननिर्णय काढून सरकारने सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा केली आहे. हा शासननिर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा बेरोजगारांची फौज रस्त्यावर उतरेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने गुरूवारी (दि.6) जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व अग्रेसर राज्य म्हणून भारतात प्रसिद्ध आहे, परंतु गेले काही दिवस आपण महाराष्ट्राच्या नावारूपास काळीमा फासणारे अनेक निर्णय घेत आहात. त्यातीलच एक निर्णय म्हणजे आपण दिनांक 14 मार्च 2023 तारखेला काढलेला सेवा पुरवठादार संस्थांची निवड करणारा शासन निर्णय (क्र.काआआ -2017 /प्र.क्र.233/ कामगार-8) बेरोजगारांवर अन्याय करणारा आहे. गेली अनेक वर्ष प्रशासनातील विविध विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगारीचा प्रचंड मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आधीच उसळलेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे अशा पद्धतीचे शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच केली आहे.

 अस्मानी आणि शासकीय संकटाला सामोरे जाणारा शेतकरी बाप आधीच अडचणीत असताना दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी देखील आपण वरील निर्णयाच्यामुळे काढून घेत आहात. आपण काढलेला जीआर म्हणजे महाराष्ट्रातील शासकीय नोकर्‍या संपवण्याची नांदीच आहे असे आम्हास वाटते. या आपल्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता पसरली असून शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण होत आहे. कदाचित ही नाराजी रस्त्यावर आल्यास महाराष्ट्रात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईच्या जनभावना लक्षात घेऊन 14 मार्च 2023 चा कंत्राटी पद्धतीवरच्या पदभरतीचा निर्णय शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात यावी. अन्यथा बेरोजगारांची एक मोठी फौज रस्त्यावर उतरेल व त्यातून निर्माण होणार्‍या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यासाठी आपण व आपले शासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.तानाजी चौधरी, जिल्हा सचिव आशिष पाटील, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष दत्ता कवडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश मुंडे, तालुकाध्यक्ष संदिप लाकाळ, विभागीय उपाध्यक्ष विलास गुंठाळ, धाराशिव शहराध्यक्ष आदित्य देशमुख, शहर कार्याध्यक्ष शुभम चव्हाण, बालाजी माळी आणि रामचंद्र लाकाळ आदींची स्वाक्षरी आहे.


 
Top