तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर येथे तालुका शिक्षक पुरस्कार हा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राणा जगजीतसिंह पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष बोबडे ,महेंद्र धुरगुडे ,तहसीलदार सौदागर तांदळे , गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड , गटशिक्षणाधिकारी मेहरुन्निसा इनामदार या मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 16 शिक्षकांचा यावेळी पुरस्काराने गौरव करण्यात आला .

शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून यावेळी आ. पाटील यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या . जुनी पेन्शन संदर्भात शासन सकारात्मक असून सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होईल असे सांगताना आपल्या सेवाकाळात शिक्षकांनी सक्षम व समर्थ नागरिक घडवण्याचे काम शिक्षकांनी करावे .कारण शिक्षकाच्या माध्यमातूनच चांगली पिढी घडत असते .सामाजिक गरजा शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून पूर्ण होतात .त्यामुळे अधिक जबाबदारी काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . भावी काळात तुळजापूर तालुक्यातून महामार्गाचे जाळे तयार होत असल्याने उद्योगधंद्यासाठी रोजगाराच्या सर्व प्रकारच्या संधी मिळणार आहेत . स्थानिकातूनच सर्वांना रोजगार मिळेल याची जाणीव ठेवून सक्षम विद्यार्थी तयार करावेत व सामाजिक योगदान देऊन आपले वेगळेपण दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्रीम. मेहरुन्नीसा इनामदार यांनी केले . यात त्यांनी तालुक्यातील शैक्षणिक आढावा मांडून तालुक्यात शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावलेला असून गुणवत्तेबरोबरच क्रीडा , संगीत व इतर सहशालेय उपक्रमाची जोड देऊन तालुक्याने आपले वेगळेपण दाखवल्याचे सांगितले . मसला खुर्द जिप शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य गीत व  ईशस्तवन तर संगीत साधक शिक्षक समूह अणदूर यांनी स्वागत गीत  सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली . दोन्ही समूहांचा आमदार पाटील यांनी विशेष सत्कार केला . पुरस्कार प्राप्त शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे यांनी पुररस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना कौतुकाची थाप अधिक उत्साह वाढवते असे सांगितले . विस्ताराधिकारी डॉ यशवंत चव्हाण यांनी आभार मानले तर श्री विठ्ठल नरवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी अर्जुन जाधव , डॉ .यशवंत चव्हाण , मल्हारी माने, मल्लिनाथ काळे ,शोभा राऊत , तात्या माळी , दैवशाला शिंदे ,केंद्रप्रमुख संजय सोलनकर ,तानाजी महाजन , ऋषिकांत भोसले , सतीश हुंडेकरी ,तुकाराम क्षिरसागर ,संजय वाले ,विठ्ठल गायकवाड ,सत्तेश्वर जाधव , विश्वनाथ सोनटक्के ,बळवंत सुरवसे ,अनिल करदुरी , अरुण अंगोले ,सोलसे एस व्ही ,अनिल राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले .


 
Top