धाराशिव येथील उपकेंद्रासाठी 8 कोटी 55 लाख 77 हजारांची तरतूद

धाराशिव / प्रतिनिधी-

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सन 2023 - 24 साठीच्या 301 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला अधिसभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात धाराशिव येथे असलेल्या विद्यापीठ उप परिसराच्या विकासासाठी आठ कोटी 55 लाख 77 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुलांचे वस्तीग्रह , क्रीडांगण विकास , नाट्यशास्त्र विभागासाठी खुलेनाट्यगृह यासह विद्यापीठ उप परिसरात कार्यरत असलेल्या विविध विभागांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

   डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्प मंजुरीसाठी 12 मार्च 2023 रोजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्र कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाठ कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या उपस्थितीत विशेष (सिनेट )अधीसभा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 या अर्थसंकल्पात धाराशिव येथील उपकेंद्र परिसरात कार्यरत असलेल्या विविध विभागांसह मुलांचे वसतिगृह , खेळाचे मैदान आणि नाट्यशास्त्र विभागासाठी खुलेनाट्यगृह , विद्यापीठ उप परिसरात  नुकतेच उभारण्यात आलेले विश्रामगृह आणि रेस्टॉरंट साठी फर्निचर तसेच इतर आवश्यक साहित्य यासाठी चार कोटी 62 लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

तसेच नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी स्किल बेस्ड ट्रेनिंग कोर्सेस सुरू करण्याचे या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प लक्षात घेता ही अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी धाराशिव येथील आधी सभा सदस्य श्री देविदास पाठक यांनी विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून (सी एस आर )सामाजिक उत्तरदायित्व निधी च्या माध्यमातून धाराशिव सारख्या आकांक्षित जिल्ह्यात कुशल  प्रशिक्षित मनुष्यबळाच्या  निर्मितीसाठी स्किल बेस्ड कोर्सेस सुरू करण्याची सूचना केली ती कुलगुरूंनी तात्काळ मान्य करून या अर्थसंकल्पात समाविष्ट केली आहे.

तसेच  धाराशिव जिल्ह्यातील विविध संलग्नित महाविद्यालये विद्यार्थी यांच्या सोयीसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता ही आधी सभा सदस्य श्री देविदास पाठक यांनी यावेळी व्यक्त केली.


 
Top