उस्मानाबाद  /प्रतिनिधी - 

उस्मानाबाद जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा म्हणून जाहीर आहे. जिल्हयात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे. दुष्काळी जिल्हा म्हणुन जिल्हयाकडे पाहीले जाते, असे असतानाही प्रशासनाने कोणतीही नोटीस न देता जिल्हयातील साडेबारा हजार हेक्टर जमिन वर्ग दोनमध्ये केल्याने अनेक शेतकरी पुत्रांचे लग्न मोडले. तर कांही शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ आली आहे. या विरोधात २७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजता मोर्चा काढणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे सुधीर पाटील व धनंजय शिंगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

४० वर्षांपासून वैयक्तिक नावे असलेल्या जमिनी व प्लॉट कोणतीही चौकशी न करता, कोणतीही माहिती न घेता प्रशासनाने एका रात्रीत वर्ग दोनमध्ये केल्या आहेत. वास्तविक ४० वर्षांपुर्वीच हैद्राबाद अॅक्ट नुसार वतन, ईनाम, देवस्थान, वक्फ बोर्ड आदी नावे असलेल्या जमिनी  योग्य ते पैसे भरून वर्ग १ झाल्या आहेत. याबाबत न्यायालयाने ही एकदा पैसे भरून खालसा केलेल्या जमिनी परत वर्ग दोन मध्ये घेऊन जाऊ नये अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने पुर्वीच घेतला आहे, असे असतानाही प्रशासन व तत्कालीन जिल्हाधिकारी व विद्यमान तहसीलदार शेतकऱ्यांना वेठीस धरून हुकूमशाही पध्दतीने संबंधीत जमिनीचे व प्लॉट चे नजरा व दंडाची रक्कम त्वरीत प्रशासनानेकडे जमा करावे, नाहीतर आपली जमिन सरकार जमा होईल, अशा प्रकारची धमकी दिली जाते, असे पाटील व शिंगाडे यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेस उमेशराजे निंबाळकर, सुभाष पवार, सुधाकर महाजन, मदन पवार, सुरेंद्र मालटेवार आदी उपस्थित होते. 

सातारा व विदर्भाप्रमाणे निर्णय घ्या

राज्यात सातारा, बीड, उस्मानाबाद व विदर्भात वर्ग एकच्या जमिनी वर्ग दोन मध्ये नेहल्याबाबत कारवाई चालू आहे. परंतू सातारा, बीड व विदर्भात कायद्यात बसवून व योग्य ते कागदपत्र तपासून योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयात पण कागदपत्र तपासून निर्णय घ्यावा, असेही सुधीर पाटील यांनी सांगितले. 

 
Top