उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

 सध्या झी-5 वर गाजत असलेल्या महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काळे धंदे’ या वेब मालिकेतील कलाकारांनी बॅन्ड कलाकारांबद्दल अपशब्द व अर्वाच्च भाषा वापरून अपमान केला आहे. त्यामुळे जिल्हा बॅन्ड-बॅन्जो मालक संघटनेच्यावतीने वेब सिरीज बंद करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे, तर दिग्दर्शक मांजरेकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झी-5 वरील काळे धंदे या वेब मालिकेत एका परिवारातील लग्नाचा प्रसंग आहे. यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी लग्नसमारंभात चित्रीत करून बॅन्ड वादकांचा अपमान केला आहे. मालिकेतील अश्लील भाषा संवादामुळे बॅन्डवाल्यांचा समाजातील मान सन्मान कमी लेखला गेला आहे. या प्रसंगात मांजरेकर यांनी, कारे श्राध्दाचे जेवायला आले का, आत कसे आला, बाहेर उभा राहा, असे म्हणून शिवराळ भाषा वापरली. हा बॅन्डवाल्यांचा अपमान असल्याचा आरोप करत कुटुंबाजी उपजीविका भागविण्यासाठी बॅन्ड वाजविणार्‍या कलाकारांप्रति अवमानकारक वक्तव्य आहे. त्यामुळे माजरेकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व काळे धंदे ही वेबसिरीज बंद करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बॅन्ड बॅन्जो मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष संभाजी कांबळे, सुजित औताडे, लक्ष्मण गव्हाणेे, रवींद्र लांडगे, प्रेमानंद सपकाळ, तानाजी कांबळे, पंकज साळुंके, किरण कांबळे, चंद्रशेखर कांबळे, आदेश कांबळे, प्रेमनाथ नरवडे आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top