उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद  जिल्ह्यात सक्षम बालविवाह निर्मुलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग, युनिसेफ व सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा बाबत जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली. बाल विवाह निर्मूलन कृती आराखडा तयार करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील अंकुश, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्याम गोडभरले, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंके, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अरविंद थोरात आदी उपस्थित होते.

 या प्रमुख विभागानुसार जिल्हा कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबतचे प्रस्ताविक व आराखड्याचे सादरीकरण एसबीसी-३, युनिसेफ च्या प्रकल्प समन्वयक सोनिया विक्रम हंगे यांनी केले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी उपस्थित सर्व  विभागांना विभागीय कृती आराखड्याची प्राथमिक तत्वावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

 त्याचबरोबर मुलींची शाळेतील गळती थांबविण्याकरिता उपक्रम,  खेळाच्या मार्फत मुलींच्या सक्षमीकरण करण्याच्या हेतूने थ्रो बॉल खेळ शिकवणे, पोलीस विभागाच्या मदतीने स्वरक्षणाचे धडे किशोरवयीन मुलींना देणे, ग्राम बाल संरक्षण समिती सक्रिय करून दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बालविवाह प्रतिबंधाबाबत गाव पातळीवर जनजागृती कार्यक्रम घेणे आदी विषयांवर चर्चा करून तात्काळ अंमलबजाणी  करण्याबाबत निर्देश दिले.

   प्रत्येक ग्रामपंचायत, ग्राम बाल संरक्षण समितीला दर महिन्याला "मागील महिन्यात आपल्या गावात कुठलाही बालविवाह झाला नाही" असे प्रमाणपत्रित करून देणे. बालविवाह प्रतिबंधात्मक पोस्टर आणि बॅनर याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार जिल्ह्यामध्ये करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी दिली.

  प्रत्येक महिन्यातील चौथा आठवड्यात जिल्हा कृती दलाच्या बैठकीत बालविवाह संबंधित उपाययोजना आढावा घेतला जाईल, अशी सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिली. पोलीस विभागाद्वारे जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील व एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थी  यांना बालविवाह प्रतिबंधात्मक प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास त्यावर जिल्हा प्रशासनाकडून त्वरित कारवाई केली जाईल. बालविवाह संबंधित प्रतिबंधात्मक व हस्तक्षेप अशा दोन्ही भूमिकेतून जिल्हा प्रशासन काम करेल असे सर्व विभागाने आश्वासन दिले.

  बैठकीच्या शेवटी सर्वांनी जिल्हा कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकूश यांनी केले.


 
Top