उस्मानाबाद /प्रतिनिधी -

 येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि वस्तीगृह  इमारत बांधकामासाठी सीएसआर (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी - कंपन्यांना झालेल्या नफ्यातील सामाजिक जबाबदारीतून समाजोपयोगी कार्यासाठी राखीव ठेवलेला निधी ) च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सचिव वैद्यकीय शिक्षण यांच्या स्तरावरून बैठक घेण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन साहेब यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.  धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अडी अडचणी व प्रस्तावित वैद्यकीय शिक्षण संकुलाबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीवरून आयोजित बैठकी मध्ये  वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सदरचे आदेश दिले आहेत . सदरील बैठकीस आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.  अश्विनी जोशी, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव श्री.प्रकाश सुरवसे आदी सहभागी होते. 

सदरील बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण संकुलासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून घेणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक प्राध्यापक वर्ग तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी निधीची उपलब्धता करून घेणे याबाबत सविस्तर चर्चा झाली.

इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी सीएसआर च्या माध्यमातून उपलब्ध करून देणे साठी सचिव वैद्यकीय शिक्षण यांच्या स्तरावर बैठक घेण्याचे निश्चित झाले असून जलसंपदा व कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधून आवश्यक जागा मिळविण्यासाठी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उस्मानाबाद यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहेत. अध्यापकांची आवश्यक पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करावा तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या पदभरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त (वैद्यकीय शिक्षण) यांना देण्यात आल्या आहेत.

सदरील बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही सुरू झाली असून डॉ. दिलीप म्हैसेकर संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी धाराशिव उस्मानाबाद येथे येऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जलसंपदा विभागाच्या जागेची पाहणी केली आहे.

 
Top