उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मासापच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "हे जगण्याचे भाषांतर" या मराठी गजल मैफिलीस उस्मानाबाद वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राध्यापक राहुल देव कदम यांची शब्दप्रधान गायकी, कवी रवी केसकर यांचे अफलातून सूत्रसंचालन आणि उपस्थित श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद यामुळे मैफिल उत्तरोत्तर रंगात गेली

 कोणती जागा जिथे नाही गजल

रंगल्या माझ्या दिशा दाही गझल

काळजाचे रक्त थोडे शिंपले

रंगल्या तेव्हा कुठे काही गझल

जेवढे सोपे जगाचे बोलणे

तेवढी सोपी कुठे आहे गझल

 कवी वैभव देशमुख यांच्या या ओळींनी मैफिलीची सुरुवात झाली.

दिलासे दिल्याने बरे वाटते

जराशी पिल्याने बरे वाटते

साहेबराव ठाणगे यांची गजलही भाव खाऊन गेली. शेखर गिरी यांच्या खालील गजलेवर उपस्थितांनी ठेका धरला.

हवा वाहताना जरा काळजी घे

दिवा लावताना जरा काळजी घे

दगाबाज काटे असे भोवताली

फुले तोडताना जरा काळजी घे

 कधी प्रेमभावना तर कधी टोकदार सामाजिक आशय तर कधी हलक्याफुलक्या भाषेतील सूचक भाष्य असा दिमाखदार सोहळा यानिमित्ताने उस्मानाबाद शहरातील रसिकांना अनुभवता आला. सतीश दराडे, सुधीर मुळीक

 तत्पूर्वी भानू नगर येथील सिद्धगणेश मंदिराच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उस्मानाबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जैस्वाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मसापचे अध्यक्ष श्री नितिन तावडे यांनी प्रमुख उपस्थिती होती. मंद प्रकाश व्यवस्था, मध्येच येणारी बोचऱ्या वाऱ्याची झुळूक आणि गिटार आणि बासरीच्या सोबतीला काळीज कापत जाणारा राहुलदेव कदम यांचा स्वर. असा अविस्मरणीय अनुभव उपस्थित रसिकांनी मनसोक्त अनुभवला. गिटारवर स्वराज्य भोसले, तबला खंडू मुळे, बासरी सारंग भोळे तर संवादिनीवर गोविंद पवार यांनी साथ संगत केली.

 राज्यसरकारचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार संजय देशमुख यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजी चव्हाण यांना जाहीर झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. मागील दहा वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील साहित व सांस्कृतिक चळवळ अधिक वेगाने पुढे घेऊन जाण्याचा सन्मान आपल्याला लाभला असल्याची भावना मसापचे अध्यक्ष श्री नितीन तावडे यांनी व्यक्त केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी तर आभार प्रा. डॉ. प्रशांत चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसापचे सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top