उस्मानाबाद / प्रतिनिधी-
२०२२ मधील खरीप हंगामाचा पीक विमा देताना भारतीय कृषी विमा कंपनीने विमा रक्कम वितरणात प्रचंड मोठी असमानता व विसंगती केली आहे. त्यामुळे ती विमा रकमेतील वाटपाची असमानता दूर करून सर्वांना सरसकट विमा वितरित करण्यात यावा. तसेच विहिरीवरील विद्युत पंपाची वीज कनेक्शन तोडणी थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने भारतीय कृषी विमा कंपनीच्या व्यवस्थाकाकडे व महावितरण कंपनीच्या अभियंत्याकडे दि.५ डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील शेतकऱ्यांनी २०२२ मध्ये आपल्या कंपनीकडे खरीप हंगामाचा परिसर व वेळेत विमा भरलेला होता. परंतू विमा कंपनीने दि.३० नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याच्या रकमा जमा केल्या आहेत. त्या रकमेमध्ये फारच विसंगती आहे. एकाच गट नंबरमधील २ शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र असताना त्यांना मिळालेल्या रकमेमध्ये दुपटीपेक्षा जास्त तफावत आहे. तसेच आपल्या कंपनीने शेतकऱ्यांनी केलेल्या नुकसानीच्या तक्रारी ७२ तासाच्या आत असून त्या अनुषंगाने व त्या कालावधीतच पंचनामे कंपनी व कृषी विभागामार्फत वेळेच्या आत होणे आवश्यक असताना ते खूपच उशिरा व अयोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सातत्य दिसून येत नाही या पंचनाम्याच्या सत्य प्रती आम्हा शेतकऱ्यांना पाहण्यास उपलब्ध करून द्याव्यात. तर झालेला अन्याय दूर करून सर्वांना सरसकट विमा रक्कम देण्यात यावी. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसान तक्रारीचे ऑनलाईन ७२ तासांच्या आत माहिती कळविलेली असताना देखील त्याचे पंचनामे न करणे व संबंधित शेतकऱ्यांना विमा त्यांच्या बँक खात्यात योग्य त्या नुकसानीच्या प्रमाणात जमा न करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले ते प्रत्यक्ष बाधित क्षेत्रात न जाता कुठेतरी एका जागेवर बसून व चिरीमिरी देऊन, घेऊन टक्केवारी लावण्यात आली आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांची टक्केवारी जास्त लावली असून ज्या शेतकऱ्यांनी काही दिले नाही अशा शेतकऱ्यांची टक्केवारी कमी लावून त्यांना मिळणाऱ्या योग्य त्या विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वरील झालेला अन्याय दूर करून योग्य तो मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये असे आदेश असताना देखील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून मोबाईलवर संदेशाद्वारे कृषी पंप धारकांना वीज कनेक्शन तोडण्यात येईल अशा आशयाचे मेसेज शेतकऱ्यांना आले आहेत. सततचा पाऊस नापिकी यामुळे शेतकरी त्रस्त असून शेतकऱ्याकडे वीज बिल भरण्यास आज रोजी कोणताही आधार नाही त्यामुळे कृषी पंपाची वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावर शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, उस्मानाबाद तालुकाप्रमुख भारत पाटील, अम्ब्रेश्वर काकडे, बळीराम एडके, रामलिंग मारकड, ओम शिनगारे, संदीप पाटील, सुनील जाधव, संजय सलगर, प्रवीण नाताळे, तुकाराम एडके, विश्वंभर पांचाळ, पोपट सलगर, अजित भोजने, उमाकांत जहागीरदार, आकाश भंडारे, उदय कुलकर्णी, दत्तात्रय बनसोडे, रामेश्वर काकडे, श्याम भारती, श्रीकांत मारकड, पंढरी कोळी, आत्माराम बंडगर, नारायण भोजने, धनंजय तवले, अनिल गायकवाड, पांडुरंग कोळी आदींसह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.